काय आहे NPCI चा नवा नियम?

एनपीसीआयने 24 एप्रिल 2025 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सर्व UPI आधारित अ‍ॅप्सना 30 जून 2025 पासून हा नवा नियम लागू करणे बंधनकारक असेल. या नियमानुसार कोणतीही व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला (Person-to-Person – P2P) किंवा व्यापाऱ्याला (Person-to-Merchant – P2PM) पैसे पाठवेल. तेव्हा पेमेंट कन्फर्म करण्याच्या अंतिम स्क्रीनवर पैसे स्वीकारणाऱ्याचे बँकेच्या कोअर बँकिंग सोल्युशन (CBS) प्रणालीमध्ये नोंद असलेले सत्यापित (Verified) नावच दाखवावे लागेल.

बदल का करण्यात आला?

आत्तापर्यंत UPI अ‍ॅप्समध्ये पेमेंट करताना अनेकदा QR कोडवरून घेतलेले नाव, वापरकर्त्याने स्वतः ठेवलेले किंवा सेव्ह केलेले टोपणनाव (Alias), किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधील नाव दिसत असे. हे जरी सोयीचे वाटत असले तरी यामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होत होता आणि फसवणुकीला वाव मिळत होता. अनेक घोटाळेबाज प्रसिद्ध व्यक्ती, कंपन्या किंवा ब्रँड्सच्या नावाने बनावट UPI आयडी तयार करून लोकांची फसवणूक करत असत. आता मात्र बँकेने सत्यापित केलेले खरे नाव दिसल्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला मोठा आळा बसेल.

‘अल्टिमेट बेनिफिशियरी’चे खरे नाव दिसणार

एनपीसीआयच्या व्याख्येनुसार, ‘अल्टिमेट बेनिफिशियरी’ म्हणजे ती व्यक्ती किंवा संस्था जी वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात प्रत्यक्ष पैसे स्वीकारत आहे. बँकेकडील CBS डेटा हा बँकांच्या नियंत्रणात असतो आणि सुरक्षित प्रणालीद्वारे (APIs) मिळवला जातो. यामध्ये वापरकर्ते किंवा अ‍ॅप्स स्वतःहून बदल करू शकत नाहीत. त्यामुळे आता पेमेंट करताना दिसणारे नाव हे पूर्णपणे सत्यापित असेल. ज्यामुळे पैसे पाठवणाऱ्याला समोरच्या व्यक्ती/संस्थेची अचूक ओळख पटेल आणि चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याचा धोका टळेल.

पैसे पाठवण्याची पद्धत बदलणार नाही

या नवीन नियमामुळे UPI ने पैसे पाठवण्याच्या मूळ पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. वापरकर्ते पूर्वीप्रमाणेच UPI आयडी, फोन नंबर किंवा QR कोड स्कॅन करून पेमेंट प्रक्रिया सुरू करू शकतील. केवळ अंतिम टप्प्यात, जिथे तुम्ही पेमेंट कन्फर्म करता, तिथे दिसणाऱ्या नावात बदल होईल. कोणतेही टोपणनाव किंवा सेव्ह केलेले नाव न दिसता, फक्त बँकेतील नोंदणीकृत आणि सत्यापित नावच दिसेल.

फसवणुकीला चाप, वापरकर्त्यांचा विश्वास वाढणार

तज्ज्ञांच्या मते या बदलामुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होईल. एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेसचे राहुल जैन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, अनेक घोटाळेबाज ब्रँड्ससारखी नावे वापरून लोकांना फसवत असत. आता CBS व्हेरिफिकेशनमुळे त्यांना असे करणे खूप कठीण होईल. यासोबतच पेमेंट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे खरे नाव तपासता येणार असल्याने वापरकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि चुकून होणारे चुकीचे व्यवहारही कमी होतील.